माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यपध्दती


उपलब्ध असणाऱया जवळ-जवळ सर्वच माध्यमांचा प्रसिध्दीच्या कामासाठी वापर करुन घेण्यात येतो. त्यासाठी मुख्यालयात (1) वृत्त (2) जाहिरात (3) प्रदर्शने (4) प्रकाशने (5) वृत्तचित्र आणि (6) माहिती- तंत्रज्ञान शाखा कार्यरत आहेत. तसेच आस्थापना आणि लेखा या दोन शाखाही कार्यरत आहेत. मुख्यालयात आणि राज्यभर सर्वत्र असंख्य प्रकारचे उपक्रम दैनंदिन स्वरुपात राबविण्यात येत असतात. त्यांची तात्काळ आणि प्रभावी प्रसिध्दी करण्याचे काम महासंचालनालयास करावे लागते.

वर्तमानपत्रातून बातम्या/जाहिराती प्रसिध्द करण्याबरोबरच आकाशवाणी/ दूरदर्शन आणि विविध उपग्रह वाहिन्यांचाही प्रसिध्दीसाठी वापर करुन घेण्यात येतो.

विविध वाहिन्यांवरील वार्तापत्रासोबतच अन्य विकासात्मक कार्यक्रमांतही शासकीय यंत्रणेचा सहभाग असावा यादृष्टीने नियोजन केले जाते. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य सर्व संबंधितांकडून मिळविण्याचे काम महासंचालनालयास करावे लागते.

प्रकाशने शाखेमार्फत लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र आणि अन्य नैमित्तिक प्रकाशने प्रसिध्द केली जातात. तसेच भित्तीपत्रिका, घडीपत्रिका तयार करुन त्यांचे वितरण केले जाते. लोकराज्य आता शासनाच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. लोकराज्य राज्यभर स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे व त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

प्रदर्शने शाखेमार्फत विविध विकास कामांवर आधारित प्रदर्शन संच तयार करुन त्यांचे आयोजन राज्यभर अनेक ठिकाणी करण्यात येते. तर माहिती-तंत्रज्ञानविषयक कामकाजाचे संपूर्ण समन्वयन माहिती-तंत्रज्ञान शाखेमार्फत करण्यात येते.

मुख्यालयात विभागीय संपर्क कक्ष कार्यरत असून विभागीय संपर्क अधिकाऱयांच्या मदतीने सर्व विभागांच्या कामकाजाची दैनंदिन प्रसिध्दी प्रभावीपणे करता येते. नव्याने उदयाला आलेल्या इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या गरजा लक्षात घेऊन जुन्या चित्रपट शाखेचे रुपांतर वृत्तचित्र शाखेत करण्यात आले आहे. दैनंदिन बातम्यांचे चित्रिकरण, यशकथा, माहितीपट तयार करुन त्यांचे वितरण या शाखेमार्फत करण्यात येते.

साधन-सामग्री :

माहितीच्या प्रसारणाच्या दृष्टीने महासंचालनालयाकडे अद्ययावत अशी यंत्रणा उपलब्ध आहे. महाराष्ट्राबरोबरच दिल्ली आणि गोवा येथील कार्यालयेही ई-मेल/ इंट्रानेटद्वारे जोडण्यात आली असून दैनंदिन स्वरुपाचे बरेचसे कामकाज संगणकाद्वारे केले जाते.

सुमारे 150 वर्तमानपत्रांना ई-मेलद्वारे बातम्यांचे वितरण केले जाते तर सुमारे 70 वृत्तपत्रांना Font Suvidha या विशेष आज्ञावलीद्वारे बातम्या पाठविल्या जातात.

आवश्यक तेव्हा अधिकाऱयांशी तातडीने संपर्क साधण्याच्या दृष्टीने Video Conferencing ची सुविधाही उपलब्ध असून त्याचा नियमित वापर करण्यात येतो. विविध समारंभांचे चित्रिकरण करता यावे यासाठी सर्व जिल्हयात डिजिटल कॅमेरे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

अनेकदा विविध समारंभांची स्थिर-चित्रेही (Still photo) फोटो गियरद्वारे डिजिटल पध्दतीने पाठविले जातात.

अधिकारी / कर्मचारी :

महासंचालनालयात बहुतेक सर्व अधिकारी-कर्मचाऱयांनी माहिती-तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण घेतले असून या ज्ञानाचा लाभ ते आपल्या दैनंदिन कामकाजात करुन घेत असतात.

सर्व जिल्हा माहिती अधिकारी हे पत्रकारितेचे पदवीधर/पदविकाधारक असून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभवही घेतलेला आहे.

दैनंदिन वृत्त प्रसारणाच्या कामाबरोबरच माध्यम प्रतिनिधींना अन्य प्रकारची माहिती/संदर्भ उपलब्ध करुन देण्याचे आणि तत्सम जनसंपर्काचे कामही या अधिकाऱयांना करावे लागते त्यासाठी सर्वभर सतत विविध प्रकारच्या मोहिमा राबविण्यात येतात.

शासनामार्फत सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाच्या अनेक योजना सातत्यपूर्ण पध्दतीने राबविण्यात येत असतात. राज्यातील जनतेची सुरक्षा आणि कल्याण यांची सर्वस्वी जबाबदारी शासनावर असते. यासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांची माहिती करुन देण्यासाठी ही यंत्रणा आपल्यापरीने सदैव कटिबध्द असते आणि म्हणूनच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला शासनाचे नाक, कान व डोळे असे म्हटले जाते.

महासंचालनालयाच्या संशोधन कक्षाद्वारे दैनंदिन वृत्तपत्रे, राज्यातील तसेच राज्याबाहेरील नियतकालिके हयांची नित्यनियमाने छाननी करण्यात येते आणि अशा वृत्तपत्रातून व नियतकालिकातून प्रसिध्द झालेल्या महत्वपूर्ण विषयावरील लेखांची वा बातम्यांची कात्रणे काढण्यात येतात.

मंत्रालय केंद्रीय ग्रंथालयाद्वारे विविध विषयावरील उत्तमोत्तम ग्रंथाची खरेदी सतत करण्यात येते. असे ग्रंथ आवश्यकतेनुसार आणि मागणीबरहुकूम मंत्रीमंडळाचे सदस्य, मंत्रालयीन अधिकारी आणि ग्रंथालयाचे सदस्य असलेले मंत्रालयीन कर्मचारी हयांना संदर्भासाठी देण्यात येतात.

पत्रकार दौरे:

विविध वृत्तपत्रांचे तसेच वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी तसेच लेखक ह्यांचे शासनाच्या विविध विकास कार्यक्रमांच्या व कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी संबंधित भागांना भेटी देण्याच्या दृष्टीने पत्रकारदौरे आखणे व ते योग्यरित्या पार पाडणे हे हया योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

विभागीय/जिल्हास्तरीय/उपमाहिती कार्यालये/माहिती केंद्रे/परिचय केंद्रे.

जनसंपर्क माध्यमांद्वारे शासन आणि जनता हयांना जोडणारा एक दुवा हया नात्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामाचे स्वरुप दुहेरी आहे. विकास कार्यक्रमांच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अन्य कार्यक्रमांच्या बाबतीत शासनाची ध्येयधोरणे, भूमिका, उद्दिष्टे आणि कामगिरी हयाबद्दलची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम हे महासंचालनालय एक बाजूस करीत असते तर, त्याचवेळी हया सर्व गोष्टींच्या बाबतीतील सर्वसामान्य जनतेच्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून उमटलेल्या प्रतिक्रिया शासनाच्या नजरेस आणण्याची कामगिरीही ते बजावीत असते. या सर्व कामगिरीसाठी ही कार्यालये पूरक म्हणून काम करत असतात. दैनंदिन वृत्तविशेष प्रसारित करणे, प्रसिध्दी साहित्याचे वाटप करणे, विविध विषयावर निर्मित केलेले वृत्तचित्र नागरी तसेच ग्रामीण भागातून जनतेस नित्यनेमाने दाखविणे, विभागीय व जिल्हास्तरावर प्रदर्शने आयोजित करणे, शासकीय जाहिराती स्थानिक, जिल्हा व विभागीय स्तरावर वितरीत करणे आदी काम ते पार पाडतात.

माहिती केंद्रे सर्वसाधारणपणे वरीलप्रमाणेच काम पार पाडीत असली तरी महाराष्ट्र राज्याबाबत अद्यावत माहिती मिळण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य जनतेला खास सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्र राज्याची प्रतिमा निर्माण करण्याच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्राच्या विविध अंगोपांगाबाबतची माहिती महाराष्ट्राबाहेरील जनतेला पुरविण्याच्या-दृष्टीने दिल्ली व पणजी-गोवा येथील महाराष्ट्र परिचय केंद्र काम करीत आहेत. महाराष्ट्राबाहेर दिल्लीसारख्या व गोव्यात वास्तव्य करीत अलेल्या मराठी लोकांच्या व महाराष्ट्रातील त्यांच्या बांधवामध्ये परस्पर भावनिक व सांस्कृतिक संबंध दृढमूल करण्याच्या दृष्टीने एक उपयुक्त व्यासपीठ निर्माण करण्याचे महत्वाचे कामही ते करत आहेत.