दैनंदिन वृत्त

मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासासाठी कटीबद्ध - मुख्यमंत्री


मुंबई : मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. यासाठी कौशल्य विकासासह विविध कर्ज योजना, शिक्षणविषयक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून यासंदर्भातील न्यायालयीन अडचणी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मराठा बिझनेसमन फोरम व अखिल मराठा फेडरेशन यांच्यामार्फत आज येथे आयोजित मराठा सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास मराठा समाजाच्या विविध संस्थांच्या फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत पवार, प्रवीण दरेकर, आ. कालिदास कोळंबकर, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कमलकिशोर कदम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा बिझनेसमन फोरमसारख्या विविध संस्थांनी मराठा समाजासाठी विविध शिक्षणविषयक, कौशल्यविकासविषयक योजना राबविण्यासाठी शासनासमवेत काम करावे. अशा संस्थांना नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात येईल. मराठा समाजासाठी राज्य शासनाने राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरु केली, यातून 602 अभ्यासक्रमात फी प्रतिपुर्ती दिली जात आहे. मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

बहुतांश मराठा समाज शेती व्यवसायात कार्यरत आहे. शेतीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे 400 कोटी रुपये खर्च करुन 2.5 लाख तरुणांना कृषी क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना शासनाने हाती घेतली आहे. मरणासन्न झालेल्या आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला शासनाने मोठा निधी देऊन पुन्हा सक्षमपणे सुरु केले आहे. या महामंडळामार्फत मराठा समाजातील तरुणांसाठी कर्जे देण्यात येत आहेत. मराठा बिझनेसमन फोरमने प्रत्येक जिल्ह्यातून किमान 1 हजार उद्योजक तयार करावेत. या तरुणांना शासनामार्फत कर्ज तथा व्याजसवलत उपलब्ध करून देऊ. मराठा बिझनेसमन फोरमने nodal agency म्हणून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी यावेळी केले.

देशाच्या इतिहासात मराठा समाजाचे मोठे कार्य आहे. मराठ्यांच्या कार्याचा उल्लेख केल्याशिवाय देशाचा इतिहास लिहीला जावू शकत नाही. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र आजही शिवरायांनी दाखवलेल्या वाटेवर व त्यांच्या विचारधारेवर वाटचाल करीत आहे, असे ते म्हणाले.

मराठा समाजासाठी कार्य करणाऱ्या खारघर मराठा समाज (नवी मुंबई), रत्नसिंधू मराठा मित्रमंडळ (नाशिक), कोकण मराठा संघ (पुणे), मराठा मंडळ (इचलकरंजी), श्री कुलस्वामिनी शारकाईदेवी मंडळ (बडोदे), वंदेमातरम युवा संघटन रोडमराठा (पानिपत), तेलंगणा मराठा मंडळ या संस्थांचा यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच मराठा भुषण पुरस्काराने डॉ. डी. जी. हापसे, बळीराम कदम, पं. प्रशांत गायकवाड, ललिता बाबर, शंकरराव कोल्हे, कमलकिशोर कदम, प्रा. नरेंद्र विचारे यांना मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.