दैनंदिन वृत्त

सहकारातून आरोग्ये सेवेचे शुश्रुषेचे कार्य दीपस्तंभ ठरावे- राज्यपाल राम नाईक


सुमन रमेश तुलसियानी रुग्णालयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई :
 सहकारातून जन सामान्यांना आरोग्य सेवा देणाऱ्या शुश्रुषा हॉस्पिटलचे कार्य दीपस्तंभ ठरावे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी आज येथे केले. विक्रोळी येथील शुश्रुषा को- ऑप. हॉस्पिटलच्या सुमन रमेश तुलसियानी या दीडशे खाटांच्या मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून राज्यपाल श्री.नाईक बोलत होते.

याप्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आमदार प्रसाद लाड, सरदार तारासिंग, राम कदम, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार मधू चव्हाण, शुश्रुषा को-ऑप. हॉस्पिटलचे अध्यक्ष सुभाष दांडेकर, कार्याध्यक्ष डॉ. नंदकिशोर लाड, उपाध्यक्ष डॉ. दीपक देशपांडे, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा देशमुख, दिनेश अफझलपूरकर आदींची उपस्थिती होती.

राज्यपाल श्री. नाईक म्हणाले, महाराष्ट्र आणि देशात नव्हे तर जगात हा एकमेव प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळीने सर्वच क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. शुश्रुषाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातही असा दबदबा निर्माण करण्याचे काम या रुग्णालयाच्या प्रकल्पातून घडत आहे. त्याकाळी डॉ. वसंत रणदिवे यांनी वैद्यकीय क्षेत्रासाठी सहकाराचा विचार न करता तो कृतीतही उतरविला आहे. सहकाराच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या या मंडळींचे कार्य अभिनंदनास्पद आहे. हे रुग्णालय वैद्यकीय सेवेसाठी मुंबईतील आणखी एक आपलसं नाव ठरेल. या रुग्णालयाच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील गरजूंना सेवा मिळेल. त्यामुळे हा सहकारातील प्रकल्प आरोग्य सेवेच्या माध्यमातून देशात दीपस्तंभ ठरेल.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन आणि लोकार्पण असा योग या तीन वर्षांच्या काळात जुळून आला. एखाद्या क्षेत्रात समर्पित लोक काम करतात तेव्हा ते उत्तमच काम करतात याचे हे उदाहरण आहे. मुलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या महत्त्वाच्या गरजा बनल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे आजारांचे प्रमाण वाढते आहे. पण त्याचबरोबर आरोग्य सेवाही खर्चिक बनल्या आहेत. पण सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र शासनाने विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळतील आणि त्यातून पन्नास कोटी जनतेला आरोग्य सेवा मिळेल अशी महत्त्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. महाराष्ट्रातही महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून गरजू रुग्णांपर्यंत उपचार पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोग्य सेवेचे क्षेत्र हे व्यावसायिक न राहता, त्यामध्ये सेवेचा भाव असायला हवा. तेच काम शुश्रुषा को- ऑपरेटीव्ह हॉस्पिटल करत आहे. अशा प्रकल्पासाठी शासन म्हणून सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष श्री. दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष डॉ. लाड यांनी सुमन रमेश तुलसियानी रुग्णालयाबाबत माहिती दिली. यावेळी शुश्रुषाच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीबाबत स्मरणिकेचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

पुर्व द्रूतगती मार्गाशेजारी साकारण्यात आलेल्या शुश्रुषाच्या या सुमन रमेश तुलसियानी रुग्णालयाचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते रिमोटद्वारे कोनशिलेचे अनावरण करून लोकार्पण करण्यात आले. या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात 150 खाटा आहेत. सहा मजली इमारतीत विविध प्रकारच्या वैद्यकीय सुविधा ज्यामध्ये 24 खाटांचे अतिदक्षता कक्ष, सहा खाटांचे एनआयसीयू तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधांसह मॉड्युलर पद्धतीची तीन शस्त्रक्रियागृह आहेत. या रुग्णालयासाठी तुलसियानी ट्रस्टसह विविध घटकांनी भरीव निधीचे योगदान दिले आहे.