माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे. शासन आणि जनता यांना जोडणारा तो एक महत्त्वाचा दुवा असून शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत आणि त्याबाबतच्या जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालयास पार पाडावी लागते.
महाराष्ट्र शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, धोरणे, विविध मोहिमा आणि विविध योजनांची माहिती या यंत्रणेद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येते. दैनंदिन वृत्तविशेष प्रसारित करणे, प्रसिद्धी साहित्याची निर्मिती करून वाटप करणे, विविध विषयांवर माहितीपट निर्माण करणे, राज्य विभागीय व जिल्हा स्तरावर प्रदर्शने आयोजित करणे, विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत योजनांची शासनासंबंधीची माहिती पुरविणे, शासकीय जाहिरातींचे वृत्तपत्रांना वाटप करणे या गोष्टींचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यात समावेश होतो. जनतेची मते व प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी राज्यात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व महत्वाच्या वृत्तपत्रांची व अन्य प्रकाशनांची रोजच्या रोज ह्या विभागामार्फत माहिती घेऊन ती शासनास पुरवली जाते. मुख्यालयात आणि राज्यभर सर्वत्र असंख्य प्रकारचे उपक्रम दैनंदिन स्वरूपात राबवण्यात येत असतात. त्यांची तत्काळ आणि प्रभावी प्रसिद्धी करण्याचे काम महासंचालनालयास करावे लागते.
रचना
महासंचालक या पदावरील सनदी अधिकारी या यंत्रणेचा प्रमुख असतो. महासंचालकांच्या अखत्यारीत संचालक (माहिती)(प्रशासन), संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क), मुंबई येथे व औरंगाबाद, नागपूर येथेही संचालक (माहिती) ही पदे आहेत. विभागीय स्तरावर ७ उपसंचालकांची पदे आहेत. (कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नवी दिल्ली) आणि जिल्हा माहिती कार्यालये (३४) कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्रातील योजनांची माहिती महाराष्ट्राबाहेरील जनतेला देण्यासाठी दिल्ली आणि गोवा येथे महाराष्ट्र परिचय केंद्रे कार्यरत आहेत.
कार्यपद्धती : उपलब्ध माध्यमांचा प्रसिध्दीच्या कामासाठी वापर करून घेण्यात येतो. मुख्यालयात (१) वृत्त (२) जाहिरात (३) प्रदर्शने (४) प्रकाशने (५) वृत्तचित्र आणि (६) माहिती- तंत्रज्ञान शाखा कार्यरत आहेत. तसेच आस्थापना आणि लेखा या शाखा कार्यरत आहेत.
अधिकारी / कर्मचारी :
महासंचालनालयात बहुतेक सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माहिती तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण घेतले असून या ज्ञानाचा लाभ ते आपल्या दैनंदिन कामकाजात करून घेत असतात.
सर्व जिल्हा माहिती अधिकारी हे पत्रकारितेचे पदवीधर/पदविकाधारक असून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभवही घेतलेला असतो.दैनंदिन वृत्त प्रसारणाच्या कामाबरोबरच माध्यम प्रतिनिधींना अन्य प्रकारची माहिती/संदर्भ उपलब्ध करून देण्याचे आणि तत्सम जनसंपर्काचे कामही या अधिकाऱ्यांना करावे लागते त्यासाठी आवश्यक तेव्हा मोहिमा राबवण्यात येतात.
विभागीय/जिल्हास्तरीय/उपमाहिती कार्यालये/माहिती केंद्रे/परिचय केंद्रे.
जनसंपर्क माध्यमांद्वारे शासन आणि जनता यांना जोडणारा एक दुवा ह्या नात्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामाचे स्वरूप दुहेरी आहे. विकास कार्यक्रमांच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अन्य कार्यक्रमांच्या बाबतीत शासनाची ध्येयधोरणे, भूमिका, उद्दिष्टे आणि कामगिरी याबद्दलची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम हे महासंचालनालय करीत असते त्याच वेळी या सर्व गोष्टींच्या बाबतीतील सर्वसामान्य जनतेच्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून उमटलेल्या प्रतिक्रिया शासनाच्या नजरेस आणण्याची कामगिरीही ते बजावीत असते. या सर्व कामगिरीसाठी ही कार्यालये पूरक म्हणून काम करत असतात. दैनंदिन वृत्तविशेष प्रसारित करणे, प्रसिद्धी साहित्याचे वाटप करणे, विविध विषयावर निर्मित केलेले वृत्तचित्र नागरी तसेच ग्रामीण भागातून जनतेस नित्यनेमाने दाखविणे, विभागीय व जिल्हा स्तरावर प्रदर्शने आयोजित करणे, शासकीय जाहिराती स्थानिक, जिल्हा व विभागीय स्तरावर वितरित करणे आदी कामे ते पार पाडतात.
महाराष्ट्राबाहेर दिल्लीसारख्या व गोव्यात वास्तव्य करीत असलेल्या मराठी लोकांच्या व महाराष्ट्रातील त्यांच्या बांधवामध्ये परस्पर भावनिक व सांस्कृतिक संबंध दृढमूल करण्याच्या दृष्टीने एक उपयुक्त व्यासपीठ निर्माण करण्याचे महत्त्वाचे कामही ते करत आहेत.
महासंचालनालयाद्वारे विविध समाजमाध्यमांचा वापर
महान्यूज : www.mahanews.gov.in हे न्यूज पोर्टल २००८ पासून सुरू केले आहे. आवश्यकतेनुसार या पोर्टलला नवे रूप देण्यात आलेले असून महान्यूजचे विद्यमान स्वरुप माहे जुलै, २०१२ पासून सुरु करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विभागवार, जिल्हानिहाय बातम्या, यशकथा, योजना, अनुभव (फर्स्ट पर्सन), वेचक-वेधक, जय महाराष्ट्र, दिलखुलास, महाभ्रमंती, करिअरनामा, पहिले पाऊल वचनपूर्तीचे, नेटभेट, नोकरी शोधा अशी सदरे सुरू करण्यात आली आहेत. याखेरीज मुख्य बातमी, बातम्यातील महाराष्ट्र, छायाचित्र दालन, चित्रफीत दालन, मंत्रालयातून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या बातम्या, विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाज व प्रश्नोत्तरांना विशेष प्रसिद्धी दिली जाते. या पोर्टलला दरमहा अंदाजे एक लाख पस्तीस हजार युनिक व्हिजीटर्स भेट देतात तर गुगल रिसर्चप्रमाणे दरमहा साधारण सहा लाख नेटिझन्स भेट देतात. आजतागायत या पोर्टलला १,९६,७४,९४८ पेक्षा जास्त नेटीझन्सनी भेटी दिल्या आहेत.
साधन-सामग्री : माहितीच्या प्रसारणाच्या दृष्टीने महासंचालनालयाकडे अद्ययावत अशी यंत्रणा उपलब्ध आहे. महाराष्ट्राबरोबरच दिल्ली आणि गोवा येथील कार्यालयेही ई-मेल/इंट्रानेटद्वारे जोडण्यात आली असून दैनंदिन स्वरूपाचे कामकाज संगणकाद्वारे केले जाते.
सर्व कार्यालयांकडे अत्याधुनिक स्वरूपाचे संगणक, लॅपटॉप, प्रिंटर आणि स्कॅनरसारखी यंत्रणा उपलब्ध आहे. आवश्यक तेव्हा अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधण्याच्या दृष्टीने Video Conferencing ची सुविधाही उपलब्ध आहे. विविध समारंभांचे चित्रीकरण करता यावे यासाठी सर्व जिल्हयात डिजिटल कॅमेरे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. महासंचालनालयाच्या www.mahanews.gov.in आणि www.dgipr.maharashtra.gov.in या दोन वेबसाईट कार्यरत आहेत.
याव्यतिरिक्त महासंचालनालयाचे दैनंदिन काम सुरळीतरीत्या चालण्यासाठी आस्थापना शाखा, लेखा शाखा इ. शाखा कार्यरत आहेत.
- 36128 views