मुख्यालयातील शाखा
१) वृत्त शाखा : शासकीय योजना विकासकामांविषयक बातम्या, विशेष वृत्त तसेच लेख दैनंदिन स्तरावर वितरित करण्यात येतात. विभागीय संपर्क कक्षामार्फत मा. मंत्रीमहोदय तसेच सर्व विभागांच्या कामकाजाची दैनंदिन स्तरावर प्रसिद्धी करण्यात येते.
आकाशवाणी तसेच दूरदर्शन आणि विविध उपग्रह वाहिन्यांचाही प्रसिद्धीसाठी वापर करून घेण्यात येतो. विविध वाहिन्यांवरील वार्तापत्रासोबतच अन्य विकासात्मक कार्यक्रमातही शासकीय यंत्रणेचा सहभाग असावा यादृष्टीने नियोजन केले जाते. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य सर्व संबंधितांकडून मिळविण्याचे काम वृत्तशाखेच्या अधिनस्त असलेल्या द्रृकश्राव्य कक्षामार्फत करण्यात येते.
२) वृत्तचित्र शाखा : माहे नोव्हेंबर २००६ पासून शासनाची ध्येयधोरणे व लोककल्याणकारी योजना यावर आधारित माननीय मंत्री, शासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच शासनाशी संबंधित विविध विषयावरील तज्ज्ञांच्या मुलाखतींवर आधारित दिलखुलास हा कार्यक्रम राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रावरून दररोज प्रसारित केला जातो. तसेच माहे ऑगस्ट २००७ पासून जय महाराष्ट् हा कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून आठवडयातून दोन वेळा प्रसारित करण्यात येतो, शासनाच्या योजनांवर आधारित प्रसिद्धी मोहिमा राबवण्याकरिता दृक-श्राव्य जाहिराती तयार करुन त्याचे प्रसारण करण्यात येते.
3) प्रकाशने शाखा : प्रकाशने शाखेमार्फत लोकराज्य, महाराष्ट्र अहेड आणि ऊर्दू लोकराज्य ही मासिके आणि अन्य नैमित्तिक प्रकाशने प्रसिद्ध केली जातात. लोकराज्य हे मासिक राज्यभर स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध असून वाचकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकराज्य हे मासिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या http://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच मागील साठ वर्षापासूनचे लोकराज्य अंक या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
4) प्रदर्शने शाखा : प्रदर्शने शाखेमार्फत विविध विकास कामांवर आधारित प्रदर्शन संच तयार करून प्रदर्शनांचे आयोजन राज्यभर अनेक ठिकाणी करण्यात येते. राज्यभरातील होर्डिंग्जवर विकास कामांवर आधारित आकर्षक मजकूर नियमितपणे प्रसिद्ध केला जातो. राष्ट्रीय दिनांनिमित्त जाहिरातींच्या संकल्पना तयार करण्याव्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांच्या जाहिरातींच्या संकल्पना या शाखेमार्फत तयार करून देण्यात येतात.
शासनातर्फे जिल्हा, विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी त्याचप्रमाणे अशा स्वरुपाच्या प्रदर्शनातून राज्य शासनाच्या वतीने सहभागी होण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय ही शासनाची केंद्र संस्था मानण्यात आली आहे. भारतात भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनातून राज्य शासनाच्यावतीने सहभागी होण्याचे कार्यदेखील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे सोपविण्यात आले आहे.
5) संशोधन कक्ष : महासंचालनालयाच्या संशोधन कक्षाद्वारे दैनंदिन वृत्तपत्रे, राज्यातील तसेच राज्याबाहेरील नियतकालिके ह्यांची नित्यनियमाने छाननी करण्यात येते आणि अशा वृत्तपत्रांतून व नियतकालिकांतून प्रसिध्द झालेल्या महत्त्वपूर्ण विषयावरील लेखांची वा बातम्यांची कात्रणे संदर्भासाठी उपलब्ध करून दिली जातात.
6) जाहिरात : १ मे, २००१ च्या शासन निर्णयानुसार व त्याबाबत वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयानुसार वर्गीकृत जाहिरातींचे वृत्तपत्रांना वितरण करण्याचे काम तसेच ६ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्था वगळून शासनाची सर्व महामंडळे, प्राधिकरणे, आयोग व राज्य शासकीय कंपन्या यांच्या वर्गीकृत व दर्शनी जाहिराती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जाहिरात शाखा व अधिनस्त कार्यालयांमार्फत वितरित करण्याचे काम करण्यात येते.
7) अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने, मुंबई : मुद्रणालय व पुस्तक नोंदणी अधिनियम १८६७ व त्याखालील नियम यांची अंमलबजावणी हे या कार्यालयाचे मुख्य काम होय. या कार्यालयात आलेल्या वृत्तपत्रांची, नियतकालिकांची नोंदणी करणे, त्यातील मजकुराची छाननी करणे व वृत्तपत्रांची वार्षिक सूची तयार करणे, तसेच पुस्तकांचे वर्गीकरण करून तिमाही सूची छापून प्रसिद्ध करणे आदी कामे या अधिनियमाखाली पार पाडली जातात. तसेच शासनमान्य यादीवर समावेश होण्यासाठी वृत्तपत्रांच्या खपाच्या पडताळणीचे कामही केले जाते.
8) समाजमाध्यम शाखा : जनमानसात सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेऊन माहिती प्रसारण व जनसंपर्कासाठी विविध समाज माध्यमांचा वापर सुरू केला आहे. त्यासाठी समाजमाध्यम कक्ष (Social Media Cell) कार्यान्वित करण्यात आला आहे.
- 9189 views