नवी मुंबईत साकारणार आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे देशातील पहिले संकुल

 

विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत राज्य शासन विविध जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. यादृष्टिने शासनाचे मुखपत्र असलेला लोकराज्य मासिकाचा जुलै, २०२५ हा सर्वसमावेशक अंक प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

लोकराज्य जुलै, २०२५ या सर्वसमावेशक अंकात नवी मुंबईत साकारणार असलेले पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस 'एज्युसिटी' च्या माध्यमातून उभारण्याचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. देशातील शिक्षण क्षेत्रात हा मैलाचा दगड ठरेल. देशाच्या ज्ञान अधिष्ठित विकासाची दिशा दर्शवणारे आणि 'विकसित भारत २०४७' साठी हे महत्त्वाचे पाऊल असणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली जिल्ह्यातील कवंडे गावातील ऐतिहासिक दौरा, राज्य शासनाने सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य गृहनिर्माण धोरणाबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेली भूमिका, शेतीला समृद्धीकडे नेणाऱ्या पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भविष्यातील शेतीच्या दिशा स्पष्ट केल्या आहेत. 

आषाढी वारीसाठी प्रशासनाची सज्जता, केंद्राच्या योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर, अमृतस्नानांची पर्वणी, महाॲग्री डिजिटल युगात अग्रेसर ठेवणारे धोरण, समृद्ध महाराष्ट्राची भाग्यरेषा, महाराष्ट्र प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने, आपत्कालीन परिस्थितीसाठी शासनाचे प्रभावी नियोजन, महिलांची वनशक्ती, एक जिल्हा एक नोंदणी, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, 'धरती आबा' जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, सागरी पर्यटनाला चालना व जहाज बांधणी धोरण, प्रशासकीय सुधारणांतून विकसित महाराष्ट्राचे ध्येय, सशक्त विद्यार्थी सशक्त समाज या विषयावरील लेखांचाही समावेश आहे.